Asa Mee Ashi Tee to Release on 29th November

Loading...

आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण महत्वाचा आणि तो दिलखुलास अनुभवत जगणं संपूर्ण आयुष्याला समृद्ध करीत असतं. प्रेम हा आयुष्यात आलेला असाच हळुवार क्षण… प्रेमात पडलेल्या ‘त्याला’ आणि ‘तिला’ जोडणारा एक नाजूक बंध… हा बंध त्यांच्याही नकळत कधी जुळून येतो हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. प्रत्येक प्रेमकथेत असणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची गोष्ट निराळी असते. पण हे प्रेम प्रत्येकाच्याच नशिबी असतं असे नाही. प्रत्येक माणसाचं नशिब हे नियतीच ठरवते असं आपण मानतो तिथेच दुसऱ्या बाजूला नियतीपेक्षा स्वकर्तृत्व मोठं असतं, व आपलं नशीब आपण घडवतो असं मानणारा वर्गही आपल्याकडे आहे. प्रेमकथेतील अशाच ट्विस्ट वर बेतलाय आगामी मराठी चित्रपट ‘असा मी अशी ती‘. उषा सतीश साळवी यांची निर्मिती असलेल्या ‘असा मी अशी ती’ चे दिग्दर्शन अतुल कमळाकर काळे यांनी केलंय.
सिद्धार्थ कामत, रिया आणि अक्षरा यांच्या प्रेमकथेत अडथळ्याचे अनेक ट्विस्ट आहेत. त्यांच्या प्रत्येक सुखाच्या क्षणात नियती कशी आड येथे आणि पुढे जीवनच बदलून जातं. सचित पाटील, पल्लवी सुभाष, मानसी साळवी या युवा कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला ‘असा मी अशी ती’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी अनोखी ट्रीट ठरणार आहे. सोबत या चित्रपटात भरत दाभोळकर, अतुल काळे , अनुजा साठे- गोखले, विवेक गोरे, अमोल घरत, नताशा तेंडूलकर, शोमा आनंद यांच्या सोबत बालकलाकार अथर्व बेडेकर, सयुरी हराळकर, यांच्याही भूमिका आहेत. महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर येणार आहेत. अतुल कमळाकर काळे दिग्दर्शित ‘असा मी अशी ती’ ची कथा सचित पाटील यांची असून कथा विस्तार आणि पटकथा सचित पाटील, अतुल काळे आणि आशिष रायकर यांचे आहेत, तर संवाद सचिन दरेकर यांनी लिहिले आहेत.
‘असा मी अशी ती’ हा चित्रपट आजच्या तरुणाई सोबतच कुटुंबातील लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच भावेल असा आहे. दमदार कथा ही या चित्रपटाची जमेची बाब असून यातील कलाकारांच्या अभिनयाने ती अधिकच फुलली आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा ‘असा मी अशी ती’ येत्या २९ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय.

Loading...
You might also like

Comments are closed.